Read Bible

Free to use • No login or registration required • For all ages

Choose your language, version, book, and chapter below. You can optionally pick a single verse for a focused view. Then click Go to see the passage. Need help? See our How to use guide.

1 Samuel 25

1. शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्यास रामा येथे त्याच्या घरात पुरले. दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.

2. मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.

3. त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते; त्याची पत्नी तर बुध्दीने चांगली व सुंदर रूपवती होती परंतु तो पुरूष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेबाच्या कुळातला होता.

4. नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे, असे दावीदाने रानात ऐकले.

5. मग दावीदाने दहा तरुणास पाठवले आणि दावीद त्या तरुणास म्हणाला, “कर्मेल येथे जा व नाबालाकडे जाऊन माझ्या नावाने त्यास सलाम करा.

6. त्या सुखी जिवाला असे म्हणा, ‘तुला शांती असो. व तुझ्या घराला शांती असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांती असो.

7. तुझ्याकडे कातरणारे आहेत असे मी आता ऐकले. आताच तुझे मेंढपाळ आम्हाजवळ होते त्यांना आम्ही उपद्रव केला नाही आणि जितके दिवस ते कर्मेलात होते तितके दिवस त्यांचे काही हरवले नाही.

8. तू आपल्या तरुणास विचार म्हणजे ते तुला सांगतील; तर या तरुणावर तुझी कृपादृष्टी व्हावी कारण आम्ही चांगल्या दिवशी आलो”

9. मी तुला विनंती करतो जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले.

10. तेव्हा नाबालाने त्याच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले, “दावीद कोण आहे? इशायाचा मुलगा कोण? जे आपआपल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत.

11. माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?”

12. मग दावीदाचे तरुण आपल्या वाटेने परत गेले आणि माघारे येऊन त्यांनी हे सर्व शब्द त्यास जसेच्या तसे सांगितले.

13. तेव्हा दावीद आपल्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही आपापली तलवार कंबरेस बांधा.” मग प्रत्येकाने आपआपली तलवार कंबरेस बांधली दावीदानेही आपली तलवार कंबरेस बांधली आणि दावीदामागे सुमारे चारशे मनुष्ये वर गेली आणि दोनशे मनुष्ये सामानाजवळ राहिली.

14. नाबालाची पत्नी अबीगईल हिला चाकरातील एकाने सांगितले, “पाहा दावीदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले. परंतु तो त्यांच्या अंगावर धावून गेला.

15. ती माणसे तर आम्हाशी फार चांगली वागली; त्यांनी आम्हास काही उपद्रव केला नाही; जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर राहिलो तितके दिवस आमची काही हानी झाली नाही.

16. आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हांला रात्रदिवस तटबंदीसारखी होती.

17. तर आता तू काय करणार हे समजून विचार कर कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे; कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे.”

18. अबीगईलेने घाई करून दोनशे भाकरी व द्राक्षरसाचे दोन बुधले व शिजवून तयार केलेली पाच मेंढरे व पाच मापे हुरडा व खिसमिसाचे शंभर घड व अंजिराच्या दोनशे ढेपा ही घेतली व गाढवावर लादली.

19. तिने आपल्या चाकरांना म्हटले, “माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते.” परंतु तिने आपला पती नाबाल याला काही सांगितले नाही.

20. मग असे झाले की, ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पाहा दावीद व त्याची माणसे समोरून येत होती आणि त्यांना ती भेटली.

21. दावीदाने म्हटले होते की, “रानात त्यांचे जे होते त्या सर्वांतले हरवले नाही असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेले; माझ्याशी बऱ्याची त्याने वाईटाने परत फेड केली आहे.

22. जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकही पुरूष जर मी सकाळ उजाडेपर्यंत राहू दिला, तर परमेश्वर दावीदाला तसे व त्यापेक्षा अधिक करो.”

23. अबीगईलेने दावीदाला पाहिले तेव्हा ती लवकर गाढवा वरून उतरली आणि दावीदापुढे उपडे पडून तिने भूमीकडे नमन केले.

24. तिने त्याच्या पाया पडून म्हटले, “माझ्या प्रभू अन्याय माझ्याकडे माझ्याकडेच असावा आणि मी तुम्हास विनंती करते तुमच्या दासीला तुमच्या कानी काही बोलू द्या, आणि तुम्ही आपल्या दासीचे शब्द ऐका.

25. मी तुम्हास विनंती करते, माझ्या प्रभूने त्या वाईट मनुष्यास नाबालाला मारू नये, कारण जसे त्याचे नाव तसाच आहे, त्याचे नाव नाबाल (म्हणजे मूर्ख) असे आहे. आणि त्याच्याठायी मूर्खपणच आहे. परंतु माझ्या प्रभूची तरुण माणसे जी तुम्ही पाठवली त्यांना मी तुमच्या दासीने पाहिले नाही.

26. तर आता माझ्या प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे. रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून परमेश्वराने तुम्हास आवरले आहे. तर आता जे तुमचे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत.

27. आता ही जी भेट तुमच्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी.

28. मी तुम्हास विनंती करते, तुम्ही आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा करा; कारण माझे प्रभू परमेश्वराच्या लढाया लढत आहेत, म्हणून परमेश्वर माझ्या प्रभूचे घर खरोखर स्थिर करील; आणि तुम्ही जिवंत आहात तो पर्यंत तुमच्याठाई दुष्टाई सापडणार नाही.

29. जरी मनुष्ये उठून तुमच्या पाठीस लागले व तुमचा जीव घ्यायला पाहत असले, तरी माझ्या प्रभूचा जीव परमेश्वर तुमचा देव याच्याजवळ जीवांच्या समुहात बांधलेला राहील, आणि जसे गोफणीच्या खळग्यातून फेकतात, तसे तुमच्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल.

30. असे होईल की, परमेश्वराने तुमच्यविषयी जे चांगले सांगितले आहे, ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुम्हास इस्राएलाचा अधिपती नेमील.

31. तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला ह्याबद्दल तुम्हास खेद होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही. आणि परमेश्वर माझ्या प्रभूचे बरे करील तेव्हा तुम्ही आपल्या दासीचे स्मरण करा.”

32. तेव्हा दावीद अबीगईलेला म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो.

33. तुझा बोध आशीर्वादित होवो; आज रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने आवरिले ती तू आशीर्वादित हो.

34. कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो इस्राएलाचा देव परमेश्वर जिवंत आहे; जर तू मला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक पुरूष देखील सकाळ उजाडेपर्यंत जिवंत राहिला नसता.”

35. मग जे तिने दावीदासाठी आणले होते ते त्याने तिच्या हातातून घेतले व तिला म्हटले, “तू आपल्या घरी शांतीने जा, पाहा मी तुझी वाणी ऐकली आहे आणि तुला मान्य केले आहे.”

36. मग अबीगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली होती. तेव्हा नाबालाचे मन त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता, म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्यास अधिक उणे काहीच सांगितले नाही.

37. मग असे झाले की, सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या पत्नीने या गोष्टी त्यास सांगितल्या तेव्हा त्याचे मन त्याच्या आत मेल्यासारखे झाले व तो दगडासारखा झाला.

38. नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला.

39. नाबाल मेला असे दावीदाने ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादीत असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे.” मग दावीदाने अबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली पत्नी करण्याविषयीची गोष्ट काढली.

40. आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “दावीदाने तू त्याची पत्नी व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.”

41. तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, “पाहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे.”

42. मग अबीगईल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची पत्नी झाली.

43. दावीदाने इज्रेलकरीण अहीनवामलाही पत्नी करून घेतले; त्या दोघीही त्याच्या स्त्रिया झाल्या.

44. शौलाने तर आपली मुलगी मीखल दावीदाची पत्नी गल्लीमातील लईशाचा मुलगा पालती याला दिली होती.